चोरटे शिरजोर : जळगावातील दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख रुपये लांबवले
जळगाव (12 जानेवारी 2025) :मोपेडची डिक्की उघडून त्यामध्ये ठेवलेली एक लाखाची रोकड घेत चोरटे पसार झाले. ही घटना शुक्रवार, 10 रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शहरातील गोकुळ स्वीट मार्टच्या मागील बाजूच्या गौसीया मशीदबाहेर घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
शेख शोएब शेख शकील (28, रा.गुलशनेरजा कॉलनी, पिंप्राळा) यांनी त्यांच्या मालकीची मोपेड (क्रमांक एम.एच.19 डी.क्यू.5702) च्या डिक्कीत एक लाखाची रोकड ठेवली होती. त्यानंतर ते मोपेडने गावात आले. गौसीया मशीदचे बाहेर आवारात मोपेड लॉक करून ते कामाला निघून गेले. त्यानंतर ते दुपारी 1.46 वाजता मोपेडजवळ आले. त्यांनी डिक्की उघडली असता रोकड गायब झाल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी परिसरात तपास केला असता शोध लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे हे करीत आहेत. घटना कळताच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.





