पालिकेच्या निवडणुका कधी ? मुख्यमंत्री फडणवीसांनी शिर्डीतील अधिवेशनात सांगितली ही तारीख
शिर्डी (12 जानेवारी 2025) : राज्यातील पालिकांच्या निवडणुका कधी ? याबाबत नागरिकांचे लक्ष लागून असताना शिर्डीत मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. शिर्डी येथे भाजपचा राज्यस्तरीय मेळावा रविवारी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला तर येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी माधव, तर मतदार केशव
श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाभारतातील गोष्ट सांगत नरेंद्र मोदी यांना माधव आणि मतदारांना केशव अशी उपमा दिली. या केशव आणि माधव यांच्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या युद्धात विजय मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.