भुसावळातील खून प्रकरणातील आरोपींकडून चार कट्टे, तीन जिवंत काडतूस जप्त : मनमाडजवळून आवळल्या मुसक्या

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी ः एक संशयीत अद्यापही पसार ः अटकेतील आरोपींची संख्या झाली पाच


भुसावळ (13 जानेवारी 2025)  : 23 महिन्यांपूर्वी भुसावळातील शरीर सौष्ठवपटू अफाक पटेलची हत्या करण्यात आल्यानंतर या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत असलेल्या तेहरीन नासीर शेख (27) या तरुणाचा शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून खून करण्यात आला होता. खून प्रकरणी बल्लारशाह येथून सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (32, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली तर या गुन्ह्यातील प्रमुख चार आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मनमाडजवळून बेड्या ठोकल्याची माहिती जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

खुनातील प्रमुख चौघा आरोपींना अटक
अदनान शेख युनूस (29, आगाखान वाडा, भुसावळ), शेख साहील शेख रशीद (21, आगाखान वाडा, भुसावळ), अब्दुल नबी हनीफ पटेल (31, शेरा चौक, मास्टर कॉलनी, जळगाव), सनीस नाईन मोहम्मद आसीफ (19, एमआयडीसी एरिया, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असे आहे खून प्रकरण
दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून खुन्नस ठेवून शहरातील शरीर सौष्ठवपटू अफाफ अख्तर पटेल (30, डॉ.झोपे यांच्या दवाखान्याजवळ, भुसावळ) हा खडका रोडवरील अलिया कोल्डींक्सच्या दुकानात बसला असताना त्याच्यावर शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता व उपचारादरम्यान बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 रोजी तरुणाचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणातील प्रमुख संशयीत असलेला तेहरीन नासीर शेख (27) हा शहरातील जाम मोहल्ला चौकातील चहाच्या दुकानात शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता चहा पिण्यासाठी आल्यानंतर संशयीत तन्वीर मजीद पटेल, अन्वर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख रशीद यांनी अश्लील शिविगाळ करीत ‘तुने हमारे भाई को पिछले साल मारा था, अब तेरा खेल खतम’‘ म्हणत तीन गोळ्या झाडल्या होत्या. डोक्याच्या मागील बाजूला, उजव्या मानेखाली व कानावर गोळी लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर संशयीत विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पसार झाले होते.

एका आरोपीला बल्लारशातून अटक
या गुन्ह्यातील संशयीत असलेल्या सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमीज पटेल (32, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यास जळगाव गुन्हे शाखेने बल्लारशहा, जि.चंद्रपूर येथून शनिवारी अटक केली होती. संशयीताला रविवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, हवालदार सोमवंशी, सचिन पोळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चौघा संशयीतांचा मनमाडनजीक डेरा
खुनातील प्रमुख संशयीत नशिराबादमार्गे मनमाडकडे पसार झाले होते. बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचे लोकेशन मिळवत मनमाडजवळून त्यांना रविवार, 12 रोजी बेड्या ठोकल्या.

चार पिस्टल, तीन जिवंत काडतूस जप्त
आरोपींच्या अटकेप्रसंगी त्यांच्या अंग झडतीत प्रत्येकी 25 हजार रुपये किंमतीचे चार गावठी कट्टे, तीन हजार रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतूस तसेच एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी रेकी केली तसेच ते मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कातही आल्याची माहिती समोर आली आहे.

यांनी केली आरोपींनी अटक
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अमितकुमार बागुल, उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे, उप निरीक्षक मंगेळ बेंडकाळी, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार महेश चौधरी, हवालदार अनवर शेख, हवालदार निलेश चौधरी, नाईक अतुल पवार, नाईक सोपान पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, जावेद शहा, भूषण चौधरी, योगेश माळी, राहुल वानखेडे, हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.


कॉपी करू नका.