जळगावात बसमधील गर्दीचा फायदा घेत शेतकर्याकडील 22 हजार लांबवले
जळगाव (13 जानेवारी 2025) : गावी जाण्यासाठी एस.टी.बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने शेतकर्याच्या खिशातून 22 हजाराची रोकड लांबविली. ही घटना शनिवारी शहरात टॉवर चौकात बसस्टॉपजवळ घडली.
नरेंद्र युवराज पाटील (रा. डांभुर्णी, ता.यावल) यांनी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला होता. त्यांना 22 हजार 200 रुपये इतकी कांदा विक्रीतून रक्कम मिळाली होती. ही रक्कम घेऊन ते टॉवर चौकात बसच्या प्रतिक्षेत थांबले होते.


बस आल्यानंतर दरवाजातून चढत असताना प्रवाश्यांची गर्दी झाली. या गर्दीतून शेतकरी बसमध्ये चढत असताना भामट्याने ही रोकड चोरुन नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बस शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. बसची तपासणी केली असता रोकड मिळाली नाही. त्यानंतर बस मार्गस्थ करण्यात आली. या प्रकरणी शेतकर्याने शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बसस्टॉप परिसरात सीसीटीव्हीचा शोध घेऊन फुटेज प्राप्त करण्याच्या तपासाला गती दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.





