यावल शिवारात सहा हजार हजार केळी झाडे कापून फेकल्याने शेतकर्‍याचे आठ लाखांचे नुकसान

महिन्यातील तिसरी घटना शेतकरी हवालदील : पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा


यावल (13 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील अट्रावल, भालोद शेत-शिवारात गेल्या महिन्याभरात तिसर्‍यांदा केळी पिकाचे नुकसान करण्यात आले आहे. यावल शेत शिवारात पुन्हा गट नंबर 811 मध्ये सहा हजार केळीच्या कच्च्या झाडांची कापणी करून आठ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. या प्रकाराने शेतकर्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल होऊनही नुकसान करणारा अज्ञात हाती लागत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

काय घडले नेमके ?
11 जानेवारी रोजी यावलपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अट्रावल रस्त्यावरील निर्मल चोपडे यांच्या शेत शिवार गट नंबर 811 मध्ये 12 हजार केळीचे खोड लागवड करण्यात आली आहे. त्यातील सुमारे सहा हजारांवर केळीचे खोडांवरील परिपक्व न झालेले कच्चे घड अर्धवट छाटून सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटना नेहमी अट्रावल रस्त्याने का घडतात ? याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

गत आठवड्यातही नुकसान
गत आठवड्यात केशव गोवर्धन चौधरी (अट्रावल) यांच्या शेतामध्ये सुमारे तीन हजार केळीच्या खोडांची अशीच नासधूस करून अपरिपक्व खोडे अर्धे छाटून जमिनीवर फेकल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात आमदार अमोल हरिभाऊ जावळे व तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी त्यावेळी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली होती, मात्र अद्याप पावितो केशव गोवर्धन चौधरी यांच्या शेतातील गुन्ह्याचा तपास न लागता पुन्हा दुसरा गुन्हा पुढे आला आहे.

केळीचे महागडे रोप शेतकर्‍यांनी विकत घेऊन लागवड केली होती. आता एक ते दीड महिन्यामध्ये केळीचा परिपक्व झालेला माल हा व्यापार्‍यास कापून दिला जाणार होता मात्र एक महिना आधी अपरिपक्व माल अर्धवट कापून फेकल्याने शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले आहे.

निर्मल चोपडे यांच्या शेतामध्ये दोन वर्षांपूर्वी असेच नुकसान झाले होते. या संदर्भात चार दिवसांपूर्वीच कोर्टामध्ये केस सुरू झाली आणि पुन्हा ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आपल्या महसूलच्या पथकासह शेतामध्ये पोहोचल्या व त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याशी संपर्क केला व तत्काळ या अज्ञाताला शोध घेऊन त्यासाठी पथक तयार करून याचा तपास लावण्याची सूचना दिल्या.


कॉपी करू नका.