सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे ः पणन विभागाच्या 100 दिवसांचा घेतला आढावा


नाशिक (13 जानेवारी 2025) : दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणारी कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारण्यात यावेत असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृध्दी महामार्गगा लगत उभारण्यात येणार ऍग्रो हब, मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभी करावीत. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ऍग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणार्‍या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, शेतकर्‍यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणार्‍या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभगात उभारण्यात येणार्‍या ऍग्रो लोगिस्टीक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणी ही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महा बाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे. कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यातील 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपावर्गिकरण करणार. छ. संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ऍग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या 45 दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही श्री देवरा यांनी यावेळी सांगितले.

यांची होती उपस्थिती
बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे – बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.


कॉपी करू नका.