भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या हस्ते 457 कोटींच्या कामाचे भूमिपूजन
शहरातील यावल रोडसह जामनेर रोड काँक्रिटीकरणानंतर टाकणार कात
भुसावळ (14 जानेवारी 2025) : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रोडसह जामनेर रोडवर वारंवार डांबरीकरण करूनही अवजड वाहतुकीमुळे खड्डे पडत असल्याने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त होते. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून या रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर सोमवार, 13 रोजी कामांचे भूमिपूजन मंत्री संजय सावकारे व संबंधित विभागाच्या अधिकारी व भाजपा नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. तब्बल 457 रुपये कोटी खर्चातून ही कामे होत असल्याने वाहनधारकांना आगामी काळात मोठा दिलासा मिळणार असून वारंवार खड्डे दुरुस्तीची कटकट आता मिटणार आहे.
457 कोटीतून होणार कामे
सीआरएफ व हायब्रीड न्युईटी प्रकल्प योजनेतून शहरातील यावल रोडवरील जुना टोलनाका ते जामनेर शहर, गजानन महाराज मंदिर ते चोरवडपर्यंतचा मार्ग तसेच नशिराबाद ते बोदवड या रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल. त्यासाठी 457 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून या कामाचे भूमिपूजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते सोमवारी झाले.

यांची होती उपस्थिती
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, पिंटू कोठारी, प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, निकी बत्रा, बापू महाजन, पिंटू ठाकूर, मुकेश पाटील, राहुल तायडे, ललित मराठे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, कृउबा सभापती अनिल वारके, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, मुरलीधर (गोलू) पाटील आदींसह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
चोरवडपर्यंत होणार चौपदरीकरण
नाहाटा महाविद्यालयाची चौफुली ते डीवायएसपी कार्यालयापर्यंत रस्ता चौपदरीकरण होणार आहे तर आगामी सीआरएफ निधीतून जामनेर शहरापर्यंतच्या काँक्रीटीकरण कामात चोरवडपर्यंतचा मार्ग चौपदरीकरण होणार असून यामुळे शहर विकासाला गती येईल, असे मंत्री संजय सावकारे म्हणाले. भुसावळातील जामनेर रोडसह यावल रोडवर काम करताना भूमिगत गटारी होतील त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर येणार्या प9ाण्याची समस्या सुटेल. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत ही कामे होण्याची आशा आहे.
