आसराबारी व टेंभरून बारी आदिवासी पाड्यांवर पाणीटंचाई
यावलला रिपाइंचा धडक मोर्चा : तहसील कार्यालय व ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला निवेदन
यावल (14 जानेवारी 2025) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी व टेंभरूनबारी या आदिवासी पाड्यावरील पाणीटंचाई तातडीने दूर करून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. यावल तहसील कार्यालय तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. समस्या सोडवण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावल तहसीलवर धडक मोर्चा
यावल तहसील कार्यालयामध्ये तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयावर सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट तालुकाध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातून घोषणाबाजी करत या दोन्ही कार्यालयावर हा मोर्चा पोहोचला. येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी तसेच तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
या मागण्यांसाठी निघाला मोर्चा
सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री ग्रामपंचायत अंतर्गत आसराबारी हे आदिवासी पाडे आहे तसेच सातपुड्याच्या कुशीतच टेंभरून बारी हे आदिवासी पाडे आहे. या दोन्ही आदिवासी पाड्यावर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजबांधव राहतो मात्र त्या ठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. परिणामी आदिवासी बांधवांना भटकंती करून पाण्याचा शोध घेऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. पिण्याचे पाणी शोधतांना त्यांच्यावर वनक्षेत्रात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला होण्याचीदेखील भीती असते. या आदिवासी पाड्यावर तातडीने कुपनलिका मंजूर करण्यात यावी आणि तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देते प्रसंगी रिपाई तालुकाध्यक्ष विष्णू पारधेसह आदिवासी पाड्यावरील बद्रीनाथ बारेला, बाळू बारेला, प्रेमा बारेला, जैतराम पावरा, भादल्या बारेलासह मोठ्या संख्येत आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.