सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडवर मकोका


बीड (14 जानेवारी 2025) : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने चर्चेत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे समर्थक वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. कराडविरोधात कारवाईसाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनीही आक्रमक पवित्रा घेतला व मंगळवारी वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला.

आमदार धस म्हणाले, कुणालाही सोडणार नाही
भाजपाचे आमदार सुरेश धस म्हणाले की, कोणत्या गुन्ह्यात मकोका दाखल केला, याची मला माहिती नाही. पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणालाच सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे इतर आता कुणाच्या मागण्यांना काही अर्थ नाही. एसआयटीने नियमाप्रमाणे कडी जोडलेली आहे.


धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाच्या हत्येमधील जे जे आरोपी आहेत, त्या सर्वांना शिक्षा झाली पाहीजे. या गुन्ह्यात जे जे आरोपी आहेत, त्यांच्यावर 302 आणि मकोकाचा गुन्हा दाखल व्हावा. मुख्यमंत्री आणि एसआयटी योग्य दिशेने काम करत असून त्यावर आमचे समाधान आहे.

बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू
वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीतील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच पोलिसांनी जमावबंदी लागू करत प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले आहेत. पाच किंवा अधिक माणसांनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला व सार्वजनिक ठिकाणी खासगी शस्त्र बाळगण्यासही बंदी घालण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !