धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : चोरीच्या सात दुचाकींसह चोरटा जाळ्यात
दोंडाईचा हद्दीतील पाच गुन्ह्यांची उकल : दोन पसार साथीदारांचा कसून शोध

Dhule Crime Branch’s performance : Thief caught with seven stolen bikes धुळे (18 जून 2025) : धुळे गुन्हे शाखेने दुचाकी चोरी करणार्या त्रिकूटाचा शोध लावला असून त्यातील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून सहा दुचाकींसह एक बुलेट जप्त करण्यात आली आहे तर त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी (19, मालपूर, ता.शिंदखेडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुलीवर दुचाकी चोरटा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर पथकाने सापळा रचून दादू गोसावी यास अटक केली. आरोपीने चौकशीदरम्यान आपल्या दोन साथीदारांसमवेत दोंडाईचा शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दोंडाईचा हद्दीतील चार दुचाकींसह एका बुलेट चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून अन्य दोन दुचाकींबाबत पोलिसांकडून माहिती काढली जात आहे. तीन लाख 45 हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत तर पसार साथीदारांच्या अटकेनंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, संजय पाटील, सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, दोंडाईचा ठाण्याचे प्रवीण निंबाळे, राजेंद्र एंडाईत, रमेश वाघ आदींच्या पथकाने केली.
