यावल शहरातील हरिओम नगरात दुकानाला आग : 14 लाखांचे नुकसान

यावल (15 जानेवारी 2025) : शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागातील हरी ओम नगरातील दुकानाला आग लागली. मंगळवारी पहाटे पूर्वी लागलेल्या या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने 14 लाखांचे नुकसान झाले. आगीचा फटका शेजारील घरालादेखील बसला. शेजारील घराच्या खिडकी, दरवाजे देखीलजोडून 39 हजारांचे नुकसान झाले. या आगीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
शॉर्ट सर्किटने आग
यावल शहरात फैजपूर रस्त्यावरील विस्तारित भागातील हरी ओम नगरात संजेरी ग्लास हे शेख जाकीर शेख कमरोद्दिन, शेख अलतमस शेख जाकिर यांचे दुकान आहे. या दुकानाला मंगळवारी पहाटे पूर्वी अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानातील प्लायवूड तसेच अॅल्युमिनियमच्या खिडक्या, दरवाजे तयार करणारे प्लाऊड कटिंग करणारे तसेच अॅल्युमिनियम कटिंग करणार्या विविध प्रकारच्या मशिनरी तसेच अॅल्युमिनियमच्या सीट, प्लाऊडचे शीट, तयार झालेले खिडक्या दरवाजे तसेच काच व फर्निचर जळून खाक झाले. आग लागल्याचे निर्दशनास येताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. यावल नगरपालिकेचे अग्निशामक वाहन चालक कैलास काटकर, फायरमन शाहरुख खाटीक, दिनेश घारू यांनी या ठिकाणी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोवर सर्व साहित्य जळून खाक झाले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी गजानन पाटील, प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी या ठिकाणी पंचनामा केला. या आगीमध्ये दुकानदाराचे 14 लाख सात हजार रूपयाचे साहित्य जळाल्याचा पंचनामा करण्यात आला. पंचायत समितीचे माजी गटनेचा शेखर पाटील, काँग्रेस आदिवासी सेल तालुकाध्यक्ष बशीर तडवीसह विविध स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली.