वरणगावकरांचे तीन तास तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन
नवीन योजनेचे पाणी 15 फेब्रुवारी आत मिळणार : मुख्याधिकार्यांचे जलशपथीद्वारे आश्वासन
Varangaonkars protest for three hours in the Tapi river basin भुसावळ (15 जानेवारी 2025) : वरणगाव शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असलीतरी पालिकेच्या हलगर्जीपणामुळे काम मार्गी लागत नसल्याने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात बुधवार, 15 रोजी तापी पात्रात तीन तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर नगरपालिका प्रशासनाला आली व त्यांनी आंदोलकांची भेट घेत समजूत काढली. 15 फेबु्रवारी आत योजनेचे पाणी शहरवासीयांना मिळेल, अशी जलशपथ मुख्याधिकार्यांना देण्यात आली तसेच शहराला पाणी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा 20 फेब्रुवारी रोजी आंदोलन करू, असा इशारा सुनील काळे यांनी दिला आहे.
या मागण्यांसाठी आंदोलन
शहरातील विकास कॉलनी, पवन नगर, प्रतिभा नगर येथील मंजूर पाण्याच्या टाकीचे काम सुरू करावे तसेच तापी नदी पात्रात नवीन जॅकवेल मंजूर करावा, नगरपरिषद जुन्या इमारतीत प्रभाग कार्यालय सुरू करावे या मागणीसाठी बुधवारी सकाळी तापी नदीपात्रामध्ये वरणगावकरांची तीन तास जलसमाधी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात केले.

यांचा आंदोलनात सहभाग
जलसमाधी आंदोलनात उपनगराध्यक्ष शेख अखलाख, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, कामगार नेते मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, डॉ.सादीक शेख, मुस्लिम भाई अन्सारी, हाजी कदीर शेठ, नाना चौधरी, योगेश माळी, सुभाष माळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, तुकाराम कोळी, नामदेव सोनवणे, अजमल खान, फजल शेख, संदीप माळी, मयूर शेळके, भोजराज पालवे, राजू धोबी, अमृत लाला मुरायी, भगवान धनगर, अंबादास चौधरी, तालुका उपाध्यक्ष किरण धुंदे, राहुल जंजाळे, दशरथ गोसावी, विशाल चौधरी, भाऊलाल टिंटोरे, सोनू शेख, मनीष भंगाळे, संतोष रॉक, अनिल कोळी, किरण भील, राहुल धूंदे, नरेंद्र बावणे, सागर कोळी, अनिल काळे आदींचा सहभाग होता.
वरणगावकरांना पाच दिवसाआड पाणी
मुख्याधिकारी सचिन राऊत, वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी तापी नदी पात्रात येऊन सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केली व 15 फेब्रुवारीच्या आत नारीमाळा येथील शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याचे तसेच चार ते पाच दिवसां आड वरणगावकरांना पाणी देण्याचे आश्वासन दिले. विकास कॉलनी, प्रतिभा नगर, पवन नगरातील पर्यायी जागेवर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात येईल तसेच कठोरा येथील तापी नदी पात्रात नवीन जॅकवेल व इंटॅक्ट वेल मंजूर करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणीपुरवठा अभियंता जनार्दन पवार, मुक्तार खान, दीपक काळे यांनी दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव व सहकार्यांनी सर्व कार्यकर्त्यांना तापी नदीपात्रातून बाहेर काढले.
