भरधाव कार विहिरीत कोसळल्याने चौघे ठार


Four killed as speeding car falls into well जामखेड (16 जानेवारी 2025) : नियंत्रण सुटलेली कार 50 फूट खोल विहिरीत कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात चौघे ठार झाले. जामखेडमधील जांबवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

यांचा ओढवला मृत्यू
अशोक विठ्ठल शेळके (29), रामहरी गंगाधर शेळके (35), किशोर मोहन पवार (30, सर्व रा. जांबवाडी) व वाहनचालक चक्रपाणी सुनील बारस्कर (25, रा. राळेभात वस्ती, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत.

जांबवाडीकडून हे चौघे तरुण बोलेरा (एमएच 23 एयू 8485) गाडीतून जामखेडकडे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येत होते. जांबवाडी शिवारातील मातकुळी रस्त्यालगत चालक चक्रपाणी बारस्कर याचा बोलेरोवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या 50 फूट खोल विहिरीत चौघेही गाडीसह कोसळले.

विहिरीत 15 फूट खोल पाणी होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जवळच रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील मजूरही मदतीसाठी धावले. जांबवाडी येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मजुरांच्या मदतीने चारही तरुणांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.


कॉपी करू नका.