सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मोंदींना धक्का : संजय राऊत
मुंबई (16 जानेवारी 2025) : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वार्यावर असून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाही
मंगळवारी देशाचे पंतप्रधान मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार आणि याच दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला. पंतप्रधान मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारायला हवा. आम्ही काही भाष्य केलं की, त्यांना यातना होतात. पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाही. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसताहेत.

सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का
सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे. कारण 15 दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता. पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर एक तास घालवला होता. त्यानंतर सैफवर हल्ला झाला. या राज्यामध्ये कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्कील झालं आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे समजून घेतलं पाहिजे.
गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर यांना सुरक्षा
राज्याची 90 टक्के सुरक्षा, पोलीस हे महायुतीचे आमदार, फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत. आमचा उपशाखाप्रमुख फोडला तर त्याला दोन गनर, उपतालुकाप्रमुख फोडला तर त्याला एक गनर आणि जिल्हाप्रमुख फोडला तर त्याला 5 गनर दिले जातात. सामान्य माणसाला सुरक्षा नाही. पण गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर यांना सुरक्षा आहे.
