राज्यभरातील पालकमंत्री नियुक्तीची उद्या घोषणा : जळगावसाठी कुणाची वर्णी ?
दोन दिवसात महायुतीची बैठक : पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/GIRISH-GULAB-SANJAY.gif)
Appointment of Guardian Ministers across the state to be announced tomorrow: Who will be in charge of Jalgaon? मुंबई (17 जानेवारी 2025) येत्या दोन दिवसात महायुतीची बैठक होणार असून बैठकीत पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. सोमवारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्रिपदांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे असे तीन कॅबिनेट मंत्री असून कुणाची या पदावर वर्णी लागते ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
दोन दिवसात निर्णयाची अपेक्षा
पुढील आठवड्यात प्रजासत्ताक दिन आहे. या दिवशी जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते त्यामुळे सरकारकडून पालकमंत्री पदाची नावे जाहीर होणे आवश्यक आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना उलटून गेल्यानंतरही महायुती सरकारकडून पालकमंत्रिपदाचे वाटप केले गेले नव्हते. विरोधकांकडून या दिरंगाईबद्दल सरकारवर टीका केली जात होती. तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा होत्या. अनेक जिल्ह्यात पालकमंत्रिपदाकरिता तीनही पक्षातील मंत्र्यांनी दावेदारी केल्याने तिढा निर्माण झाला होता
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)
बीड राजकीय पटलावर
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीड जिल्ह्यातून पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडें यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रीपद स्वीकारावे, अशी मागणीही केली जात आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाबाबत सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष असेल.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी पालकमंत्रीपद कायम ठेवणार की शिंदे गटाला मिळणार हा सवाल आहे.
सातार्यात चार मंत्र्यांमुळे तिढा
सातारा जिल्ह्यात 4 मंत्री आहेत. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे या चारही मंत्र्यांपैकी कोणाला पालकमंत्रीपद मिळणार याकडे लक्ष लागले आहे.