भुसावळातील तापी नदीवरील पुलास संरक्षण जाळ्या न बसल्यास उपोषण : शिशिर जावळे


Fasting if safety nets are not installed on the bridge over the Tapi River in Bhusawal : Shishir Javale भुसावळ (17 जानेवारी 2025) : भुसावळातील तापी नदीवरील पूल सुसाईड पॉईंट ठरत असून आतापर्यंत अनेकांनी संतापाच्या भरात पुलावरून आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या पुलावर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या असत्या तरी आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले असते. संबंधित विभागाने तातडीने जाळ्या बसवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देवून तातडीने कामाला सुरूवात करावी, अशी मागणी भुसावळचे सामाजिक कार्यकर्ता शिशिर जावळे यांनी करीत मागणीची पूर्तता न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

तापी पुल ठरतोय सुसाईड पॉईंट
शिशिर जावळे यांच्या निवेदनानुसार, भुसावळातील तापी पुलावरील कठड्यांजवळ युवक-युवती, नागरिक कित्येक वेळा तास न तास उभे राहून गप्पा करतात शिवाय सेल्फी काढतात. या पुलावरील या लहानशा कठड्यांमुळे आजपर्यंत सातत्याने अनेकांनी तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अलीकडेच 13 ते 15 दरम्यान दोघांनी आत्महत्या केली. तापी नदीवर संरक्षण जाळ्या नसल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित तापी नदीच्या पुलावरील दोन्ही बाजूंच्या कठड्यांजवळ किमान बारा फूट उंचीच्या सुरक्षा जाळ्या बसवाव्यात व आत्महत्या रोखण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी जावळे यांनी केली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
सुरक्षा जाळ्यांमध्ये सुशोभीकरणासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध शोभीवंत फुलांच्या, झाडांच्या कुंड्या यांची व्यवस्था सुद्धा व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयांना तीन महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर सा.बां.विभागाने संरक्षण जाळ्यांचा अंदाजपत्रकाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर शासनाकडे पाठवला मात्र अद्यापही त्यावर कुठलाच ठोस निर्णय झालेला नाही. प्रलंबित अंदाज पत्रकास त्वरित मंजुरी द्यावी अन्यथा याविरुद्ध तापी नदी पुलावर आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !