भुसावळातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम
Cultural program at Jijamata Primary School in Bhusawal भुसावळ (20 जानेवारी 2025) : श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात जिजामाता जयंतीनिमित्त नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सोनू मांडे होते. उद्घाटकशाळेचे माजी विद्यार्थी आणि नाट्य कलावंत अजय पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य श्रीधर खणके उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी शाळेत जिजामाता जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अजय पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसमोर आपल्या एकपात्री कलेचे सादरीकरण केले. संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अनेक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्ये सादर केली. यात गणेश वंदना, आदिवासी नृत्य आम्ही ठाकर ठाकर, राजमाता जिजाऊ स्वगत, किलबिल गाणे, छत्रपती शिवराय व जिजामाता यांच्या जीवनावरील प्रसंग, मोबाईलचे दुष्परिणामावर आधारित नाटिका, शेतकरी गीत, गरबा नृत्य, स्फूर्तीचा जिवंत झरा हे देशभक्तीपर गीत आदी प्रकारचे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. सूत्रसंचालन सुवर्णा कुलकर्णी तर आभार मनीषा राजपूत यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.