प्रेमविवाह करणार्या जावयाची जळगावात पाच वर्षांनी हत्या : सात आरोपींना अखेर बेड्या
Son-in-law who had a love marriage murdered in Jalgaon after five years: Seven accused finally arrested जळगाव (21 जानेवारी 2025) : पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून आरोपींनी जावयाची हत्या करीत त्याच्या कुटूंबावर हल्ला चढवला होता. याप्रकरणी दहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना
मुकेश रमेश शिरसाठ (वय 26, पिंप्राळा हुडको) या तरुणाने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याने त्या रागातून तरुणीच्या कुटूंबियांनी कोयत्याने गळ्यावर वार करून रविवारी तरुणाचा खून केला होता. त्यानंतर सोमवारी मृत मुकेशच्या कुटुंबातील महिलांनी संशयिताचे बंद घर जाळण्याचा प्रयत्न केला. खुनातील 10 आरोपींपैकी सात संशयीताना पोलिसांनी अटक केली.
मुकेश शिरसाठ या तरुणाने पाच वर्षांपूर्वी पुजा सोनवणे हिच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर कुटुंबियांसह नातेवाईकांचा विरोध होता. त्यामुळे अनेकदा त्यांच्या वाद होत होते. शनिवारी रात्री मुकेश याचा लहान भाऊ सोनू शिरसाठ यांचा मित्र नकुल मनोहर वाघ या तरुणाला मुकेश सोबत का राहतो? असे म्हणून त्याच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. तर दुसर्या दिवशी मुकेशला एकटे पाहून पूजाच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यात त्याचा जीएमसीत उपचार सुरु असताना मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यातील सतीश केदार, सुरेश बनसोडे, विशाल गांगले, प्रकाश सोनवणे, बबलु बनसोडे, अविनाश सुरुवाडे व एक अल्पवयीन मुलगा अशा सात जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली.
आरोपीच्या घराला लावली आग
मुकेशचा खून झाल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या नातेवाईक महिलांनी रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जवळ असलेल्या पूजाच्या माहेरचे नातेवाईक व मुकेशवर हल्ला करणार्या संशयितांच्या घराच्या खिडकीतून विस्तव व कापडाच्या चिंध्या टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असलेल्या पोलीस व शिघ्रकृती दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग विझवली. रविववारी दिवसभर पिंप्राळा हुडकोतील बौद्ध वसाहतीत पोलिस दलाचा बंदोबस्त होता.