छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून 14 नक्षलवाद्यांचा खात्मा
14 Naxalites killed by security forces in Chhattisgarh छत्तीसगड (21 जानेवारी 2025) : छत्तीसगडमधील कुल्हाडीघाटच्या भालुदिघी टेकड्यांवर सुरक्षा दलाच्या चकमकीत आतापर्यंत 14 नक्षलवाद्यांचा सफाया करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मयत नक्षलवाद्यांकडील मोठ्या प्रमाणावरील अत्याधूनिक शस्त्रेदेखील जप्त करण्यात आली.
12 मृतदेह मिळाले
सोमवारी सकाळपासून कुल्हाडीघाटच्या भालुदिघी टेकड्यांवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काल झालेल्या चकमकीनंतर करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले, त्यापैकी एक महिला आहे. तर आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांना 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळावरून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ओडिशा राज्य नक्षलवादी प्रमुख जयराम उर्फ चलपती याचा सुद्धा सुरक्षा दलाने खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे. चलपती याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच, या चकमकीत सीसीएम मनोज आणि गुड्डू यांच्या सुद्धा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या चकमकीत एक सुरक्षा जवान सुद्धा जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जवानाला उपचारांसाठी विमानाने रायपूरला नेण्यात आले.