सधन कुटूंबातील लाडक्या बहिणींकडून सरकार रक्कम वसुल करणार : मंत्री आदिती तटकरे
मुंबई (21 जानेवारी 2025) : अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या लाडक्या बहिणी योजनेचा भार सरकारकडून आता सोसवला जात नसतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सधन कुटुंबातील महिलांनी खोटी माहिती देऊन लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याने या महिलांकडून आता सरकार पैसे परत घेण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लवकरच रक्कम सरकार परत घेणार
खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणार्या महिलांकडून या योजनेंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ वसूल केला जाईल, असे मंत्री तटकरे म्हणाल्या आहेत.
ते पैसे सरकारी तिजोरीत जमा होणार
आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेवरील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार की नाही? असा थेट प्रश्न केला. त्यावर त्या म्हणाल्या, असे कोण म्हणाले की, पैसे परत घेणार नाही. ते पैसे सरकारी चलनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची स्वतःची तिजोरी असते. त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे.