भुसावळात धनादेशाचा अनादर : आरोपीला तीन महिने शिक्षा
भुसावळ (23 जानेवारी 2025) : धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला तीन महिने कारावास आणि धनादेशाच्या दुप्पट रक्कम नुकसान भरपाईचे आदेश येथील तिसरे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम आर बागडे यांनी निकाल दिला.
असे आहे प्रकरण
आरोपी राजू भिकन मिस्त्रीवर चलनक्षम पत्रकाचा कायद्या अंतर्गत फिर्याद दाखल होती. आरोपी राजू भिकन मिस्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को आप सोसायटी, भुसावळ या संस्थेकडून 40 हजारांचे कर्ज घेतले होते, त्या कर्जाची परतफेड म्हणून आरोपी मिस्री यांनी संस्थेला 30 हजारांचा धनादेश दिला होता. धनादेशाचा अनादर झाल्यावर संस्थेने आरोपीला नोटीस देऊन अनादरीत धनादेशाच्या रकमेची मागणी केली होती, परंतु आरोपीने मुदतीत रक्कम दिली नाही.


संस्थेने आरोपीविरुद्ध चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम 138 प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयात दाद मागितली. या खटल्याची सुनावणी सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम.आर.बागडे यांचे समक्ष पुर्ण झाली. फिर्यादीतर्फे साक्षीदार अविनाश मनोहर काळे यांनी फिर्याद दिली.
संस्थेतर्फे वकील म्हणून अॅड.निलेश सुरेश भंडारी यांनी काम पाहिले. उपलब्ध साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी राजू भिकन मिस्री यास दोषी ठरवले. धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजे 60 हजारांची नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश केले तसेच नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास तीन महिने साधी कैदचे आदेश दिले.





