लाचखोरी : धुळ्यातील नगर भूमापन अधिकार्यासह नंदाणेतील आजी-माजी सरपंच न्यायालयीन कोठडीत

धुळे (27 जानेवारी 2025) : पेट्रोल पंपाच्या जागेवर ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती अडीच लाखांची लाच मागून त्यातील पहिल्या टप्प्याचे एक लाख रुपये स्वीकारताना धुळे तालुक्यातील नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच व माजी सरपंच यांना धुळे एसीबीने अटक केली तर दहा हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यातील नगरभूमापन अधिकारी भास्कर गंगाराम वाघमोडे (55, सुयोग कॉलनी, जीटीपी स्टॉप, देवपूर, धुळे) यासदेखील अटक करण्यात आली होती. संशयीतांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व नंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
आजी-माजी सरपंच न्यायालयीन कोठडी
नंदाणेतील सरपंच रवींद्र निंबा पाटील (42) व माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाठ (50) यांना पेट्रोल पंपासाठी नाहकरत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच लाखांची तडजोड मान्य केल्यानंतर एक लाखांची लाच घेताना पकडण्यात आले होेते. सुरूवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र कोठडी संपताच त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडी सुनावताच कारागृहात रवानगी करण्यात आली.
नगर भूमापन अधिकारी कोठडीत
चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यातील नगरभूमापन अधिकारी भास्कर गंगाराम वाघमोडे (55, सुयोग कॉलनी, जीटीपी स्टॉप, देवपूर, धुळे) यास धुळे एसीबीने अटक केली होती. संशयीताच्या घरातून 14 लाखांचे घबाड जप्त झाले होते तर कोठडी संपताच न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत आहेत.


