महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना हायकोर्टाकडून सात दिवसांचा दिलासा
जळगाव (27 जानेवारी 2025) : महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात ते पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाकडून सुनील महाजन यांना सात दिवसांसाठी अटकपूर्व जामिनाला मंजुरी मिळाल्याने त्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
महाजनांविरोधात दोन गुन्हे
जळगाव महापालिकेच्या मालकीची जुनी पाईप लाईन जेसीबीच्या सहाय्याने 2 डिसेंबर 2024 रोजी काढली जात होती. पाईप चोरीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढली होती. सूत्रधार सुनील महाजन असल्याचे समोर आले होते. यानंतर आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते.


अटकेपासून तूर्त दिलासा
या प्रकरणात सूत्रधार म्हणून आरोप असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन अजूनही फरार आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. सुनील महाजन सापडत नसल्याने त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरू केली होती. महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्या.पेडणेकर यांनी सुनील महाजन यांना 7 दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाजन यांच्यातर्फे अॅड.सागर चित्रे आणि अॅड.राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.





