राज्यातील 25 लाख अंत्योदय शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणार मोफत साडी
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे : कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा शुभारंभ
25 lakh Antyodaya ration card holders in the state will get free sarees from the cheap food shops भुसावळ (28 जानेवारी 2025) : राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांंना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असून सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले आहे. या माध्यमातून विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचा आशावाद वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत ‘एक रेशन कार्ड, एक साडी’ या योजनेचा शुभारंभ भुसावळ प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात सोमवार, 27 जानेवारी रोजी झाला. याप्रसंगी तालुक्यातील 10 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री सावकारे यांच्याहस्ते साडी वितरण करण्यात आले.
लाडक्या बहिणींना साडी वितरणाचा आनंद
वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागाचा पहिला कार्यक्रम भुसावळ येथे होत असल्याचा व आपल्या हस्ते लाडक्या बहिणींना साडी वितरण करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून नवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न
भुसावळच्या एमआयडीसीतील उद्योगांना चालना मिळण्यासाठी आमदार असतांना रस्ते, पाण्याची सुविधा आणि सबस्टेशनची निर्मिती करण्यात आली. आगामी काळात केळी खोडापासून धागा तयार करण्याचे युनिट तयार झाले असून आगामी काळात वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून अजून काही नवीन प्रकल्प आणण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना दिली. महाराष्ट्र शासनाच्या ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या उपक्रमांतर्गत यंदाचा वितरण सोहळ्याला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. पुढील काळात राज्यभरात या योजनेअंतर्गत महिलांना मोफत साड्यांचे वितरण करण्यात येईल. भुसावळातील एमआयडीसीतील कंपन्यांसाठी रस्ते पाण्याची सुविधा आणि सबस्टेशनची निर्मिती करण्यात आली जेणेकरून उद्योगाला चालना मिळेल, असेही मंत्री सावकारे म्हणाले.
वस्त्रोद्योग वाढीस चालना
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे त्यामुळे कापूस संबंधी प्रक्रिया उद्योग या संबंधित विभागाचे मंत्रीपद हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे असल्याने जळगाव व भुसावळ येथे संबंधित उद्योगाच्या वाढीस नक्कीच चालना मिळणार आहे.
यांची होती उपस्थिती
वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी उपस्थिताना कॅप्टीव्ह मार्केट योजनेबद्दल माहिती दिली. वस्त्रोद्योग मंत्री खाजगी सचिव प्रल्हाद रोडे, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, भुसावळ तहसीलदार नीता लबडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर यांनी तर आभार प्रदर्शन बडगुजर यांनी मानले. याप्रसंगी तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला, परितक्ता महिला यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देऊन मान्यवरांचे हस्ते ई- शिधापत्रिकांची वितरण करण्यात आले.
