सावदा नजीक 65 हजारांचे अवैध लाकूड जप्त
रावेर (28 जानेवारी 2025) : रावेर-सावदा रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने एका वाहनातून 65 हजार रुपये किंमतीचे अवैध सागवान लाकूड जप्त करीत वाहन जप्त केले. या कारवाईने लाकूड तस्कर हादरले आहे. रविवार, 26 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचार्यांनी सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या (वाहन एम.एच.04 एफ.जी. 3248) मधून सागवान पलंगाचे चार नग व एक सोपासेट जप्त केला. वाहन चालक गणेश भीमराव खैरनार (27) याच्याकडे पास नसल्याने 64 हजार 500 रुपये किंमतीचे लाकूड जप्त करण्यात आले तर एक लाख 26 हजार रुपये किंमतीचे वाहन जप्त करीत रावेर डेपोमध्ये जमा करण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे आर.आर.सदगीर तसेच चोपडा येथील सहायक वन संरक्षक प्रथमेश हळपे, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, रावेरचे वनपाल रवींद्र सी.सोनवणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, जुनोना वनरक्षक जगदीश जगदाळे यांच्या पथकाने केली.







