अल्पवयीन मुलीला पळवले : संशयीताला वरणगावात बेड्या
Minor girl kidnapped: Suspect handcuffed in Varangaon यावल (29 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील बोरावल खुर्द या गावातून बुधवार, 15 जानेवारी रोजी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात तरुणाने पळवून नेल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावल पोलिसांनी अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्या तरुणासह मुलीला वरणगाव येथून ताब्यात घेतले आहे. संशयीतास विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर एका पसार संशयीताचा शोध सुरू आहे.
असे आहे प्रकरण
बोरावल खुर्द गावातून बुधवार, 15 जानेवारी रोजी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात तरुणाने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार रोहील गणेश, प्रबुद्ध शेजवळकर, अशोक बाविस्कर, महिला पोलीस कर्मचारी सारिका वाणी यांनी वरणगाव येथून कुणाल संतोष भालेराव (19) या तरुणाला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले तर अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याकरीता शुभम समाधान भालेराव (वरणगाव) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. कुणाल भालेराव याला पोलिसांनी अटक केली असून शुभम समाधान भालेराव याच्या शोधज्ञसाठी पोलिसांची एक पथक रवाना झाले आहे. कुणाल भालेराव याला विशेष बाल न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.







