अजित पवार बीडमध्ये अॅक्शन मोडमध्ये ; कमरेला पिस्टल दिसल्यास परवाना रद्द करणार तर मकोकाही लावणार !
बीड (30 जानेवारी 2025) : स्पष्टवक्तेपणामुळे राज्यात अजित पवार ओळखले जातात. बीडमधील सरपंच हत्येनंतर त्यांच्याकडे पालकमंत्री आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात येऊन कार्यकर्ते, पदाधिकार्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. कंबरेला कुणी पिस्टल लावून फिरल्यास त्यांचा परवाना रद्द करणार असल्याचे ते म्हणाले, शिवाय वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या अधिकार्यांच्या बदल्याही आपण करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी करीत कार्यकर्त्यांनी वेडेवाकडे प्रकार केल्यास सहन करणार नसल्याचा इशारा दिला शिवाय वेळ पडल्यास मकोकाही लावणार असल्याचे ते म्हणाले. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमक्षच त्यांनी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली.
आपली विचारधारा सेक्युलर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सेक्युलर विचारधारेची आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा, हे शिकवलेलं आहे. सत्ताधारी लोकांनी कसं काम केलं पाहिजे, याचा आदर्श उभ्या महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी दिला. त्याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे.” असं पवार म्हणाले.

बीडच्या संदर्भाने अनेक वेगवेगळ्या बातम्या येत आहे. जिथं तथ्य असेल संबंधितांवर कारवाई केली जाईल. जिथं तथ्य नसेल तिथे कारवाईचा पाश्न नाही. इथं असणारे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकार्यांना सांगायचं आहे की, माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाले आणि ते व्यवस्थित केले नाही तर मी कडक कारवाई करेन. वेडेवाकडे प्रकार सहन करणार नाही. तो जवळचा किंवा लांबचा कार्यकर्ता बघणार नाही. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. तिथे गडबड होता कामा नये. केंद्राचा निधी जिल्ह्यासाठी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत.
आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकार्यांना बोलावलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगणार आहे. अनेक वर्षे मी राज्याच्या राजकारणात आहे. 1991 ला मी पहिल्यांदा खासदार झालो होतो. नंतर आठवेळा आमदार झालो. त्यामुळे माझा जिल्हा, माझा मतदारसंघ, पालकमंत्री पदाची जबाबदारी असलेला जिल्हा मी जवळचा लांबचा, जातीचा, नात्यागोत्याचा विचार केलेला नाही.
परवाना रद्द करणार
अजित पवार म्हणाले की, मी आधीच देवेंद्र फडणवीसांना सांगिलं होतं की, मी इथली जबाबदारी देत असताना मला चांगल्या कामांना साथ दिली पाहिजे. अधिकारीसुद्धा खूप वर्षे इथे थांबलेले आहेत. त्यातही दुरुस्ती करणार आहे. मी भेदभाव करीत नाही. पण जर चुकीच्या पद्धती चालत आलेल्या असतील तर त्याला आळा घातलाच पाहिजे.
कुणी रिव्हॉल्व्हर काढतं आणि वर उडवतं, कुणी कमरेला लावतात. जे कुणी असं करेन त्याचं लायसन्स कॅन्सल करायला मी जिल्हाधिकार्यांना सांगणार आहे. मी काहीही खपवून घेणार नाही. सगळ्यांना सारखा नियम लावणार आहे. मला टार्गेट करायचं नाही. बदल झाला पाहिजे, इथल्या लोकांनाही तो बदल दिसला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
चारित्र्य स्वच्छ ठेवा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकार्यांना, तरुणांना, महिला भगिनींना, वडिलधार्यांना सांगतो, सगळ्यांनी आपापलं चारित्र्य स्वच्छ ठेवा, प्रतिमा चांगली ठेवा, गुंड प्रवृत्तीची लोकं आपल्या आजूबाजूला राहाता कामा नये, यासंदर्भात सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. उद्या कुठल्या बाबतीत काही घडलं तर राजकीय हस्तक्षेप होणार नाही. मी पोलिसांनाही ते सांगणार आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना हेच सांगणार आहे. कुणावरही अन्याय होता कामा नये. हे फक्त नव्याचे नऊ दिवस नाही, सातत्य पुढे राहिलं पाहिजे.
