पानसरे हत्याकांडातील सहा आरोपींना सहा वर्षानंतर जामीन

Six accused in Pansare murder case granted bail after six years मुंबई (30 जानेवारी 2025) : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना बुधवारी मुंबई हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी जामीन मंजूर केला. तब्बल सहा वर्षांपासून आरोपी अटकेत होते.
यांना मिळाला जामीन
आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आणखी एक आरोपी डॉ. वीरेंद्र तावडेची जामीन याचिका नंतर दाखल झाल्याने न्यायालय त्यावर स्वतंत्र सुनावणी घेणार आहे. दरम्यान, बुधवारी जामीन मिळालेल्यांपैकी छत्रपती संभाजीनगरचा सचिन अंदुरे नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने तो तुरुंगातच राहणार आहे.
जामिनासाठी न्यायालयात धाव
‘सहा वर्षांपासून आपण अटकेत आहोत. अद्याप खटला सुरू आहे. नजीकच्या काळात तो संपण्याची शक्यता नाही,’ असा दावा करून आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, दोन फरार आरोपींचा तपास वगळता पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे.
त्यामुळे त्या फरारींसाठी या प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख सुरूच ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच हत्येचे मुख्य सूत्रधार सापडेपर्यंत प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरूच ठेवण्याची विनंती करणारी पानसरे कुटुंबीयांची याचिका न्यायालयाने निकाली काढली होती. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. उपरोक्त निर्णय देताना, याप्रकरणी सुरू असलेला खटला जलदगतीने निकाली काढण्याच्या दृष्टीने खटल्याची दररोज सुनावणी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.
2015 मध्ये कोल्हापुरात झाला होता खून
कोल्हापूर येथे 16 फेब्रुवारी 2015 रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या गोविंद पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.
प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोल्हापूर पोलिसांतर्फे करण्यात आला व तो नंतर सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांच्या देखरेखीत एसआयटीकडे गेला.
एसआयटीने 2018 ते 2019 या कालावधीत एकूण 12 पैकी दहा आरोपींना अटक केली, दोघे फरार आहेत. एसआयटीने आतापर्यंत चार आरोपपत्रे दाखल केली होती. मुख्य सूत्रधारांना, गोळ्या झाडणार्या दोघांना शोधण्यात एसआयटी अपयशी ठरल्याचा दावा करून पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पानसरे कुटुंबीयांची मागणी मान्य करत न्यायालयानेही ऑगस्ट 2022 मध्ये या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे दिला.


