नंदुरबार गुन्हे शाखेची दणकेबाज कारवाई : नवापूर-नंदुरबारातील दुचाकी चोरट्यांकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त
सात आरोपींना बेड्या ः एक संशयीत पसार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, विसरवाडी, नंदुरबारसह परजिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली

नंदुरबार (30 जानेवारी 2025) : दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान नंदुरबार गुन्हे शाखेने नवापूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सात आरोपींच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, विसरवाडी, नंदुरबार तसेच जिल्ह्याबाहेरून दुचाकींची चोरी केल्याची कबुली देत तब्बल नऊ लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 19 दुचाकी काढून दिल्या. आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असून त्यांना तपासासाठी नंदुरबार तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी दिलीप कोकणी (कळंबा, ता.नंदुरबार) यांच्या दुचाकी चोरीबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता व या गुन्ह्याच्या समांतर तपासात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना विसरवाडी हद्दीतील बिजादेवी गावातील राकेश कोकणी, शशिकांत कोकणी व त्यांच्या साथीदारांनी दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले.
सात आरोपींना बेड्या
विसरवाडी हद्दीतील बिज्यादेवी येथून राकेश दिलवर कोकणी (23, रा.बिजादेवी, ता.नवापूर), शशिकांत कौतीक कोकणी (26, बिजादेवी, ता.नवापूर) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी साथीदार अरविंद जगदीश कोकणी (22, नवापूर, जि.नंदुरबार), निलेश हसीराम कोकणी (24, नवापूर, जि.नंदुरबार), अनमोल ऊर्फ दादू विलास गावीत (28, रा.शेगवे, ता.नवापूर), प्रदीप राजू कोकणी (26, जि.नंदुरबार) व अल्प दरात दुचाकी खरेदी करणार्या रोहिदास मोतीराम भोई (22, जि.नाशिक) यास अटक करण्यात आली. लखन ऊर्फ लक्ष्मण अशोक वळवी (बिजादेवी, ता.नवापूर) हा संशयीत पसार झाला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, राकेश वसावे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ, मोहन ढमढेरे, राजेंद्र काटके, यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण आदींच्या पथकाने केली.