तिकीट तपासनिसांना ड्युटीवर बॉडी कॅमेरे : अप्रिय घटनेत कारवाईसाठी होणार मदत


मुंबई (31 जानेवारी 2025) : रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवाशांना पकडल्यावर ते बर्‍याचदा दंड भरण्यास तयार नसतात तसेच वाद घालून प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अशावेळी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात मात्र न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर पुराव्याअभावी संशयीतांची अनेकांची सुटका होते. ही बाब हेरून पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनिसांना (टीसी) ड्युटीवर असताना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहे. तिकीट तपासणी सुरू असताना प्रवाशांनी वाद घालत्यास, हाणामारी केल्यास त्याचे रेकॉर्डींग कॅमेर्‍यात होईल व त्या माध्यमातून संबंधिताला शिक्षा होणे सुलभ होणार आहे.

तर शिक्षा होण्याचा मार्ग सुलभ
विनातिकीट प्रवाशांना पकडल्यावर ते बर्‍याचदा दंड भरण्यास तयार नसतात. अशा वेळी टीसीशी वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टीसींच्या शरीरावर बॉडी कॅमेरे बसवून त्यांना ड्युटीवर पाठविले जाणार आहे. विनातिकीट प्रवाशांशी वाद झाल्यास रेल्वे कायदा 1989च्या कलम 140 अंतर्गत रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कारवाईसाठी उपयुक्त ठरेल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.


लवकरच सर्व स्थानकांवर तशी व्यवस्था
विनातिकीट प्रवास करताना पकडल्यानंतर, प्रवाशाने दंड भरण्यास नकार दिल्यास त्याला प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या प्री-कस्टडी एरियामध्ये ठेवण्यात येईल. तेथे त्याला नियम समजावून सांगितले जातील. जर प्रवासी दंड भरण्यास नकार देत असेल तर एक मेमो जारी करून त्याला आरपीएफकडे सुपूर्द केले जाईल. सध्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांवर प्री-कस्टडी एरिया तयार करण्यात येत आहे. कालांतराने सर्व स्थानकांवर तशी व्यवस्था करण्यात येणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !