सुसरी शिवारात राखेच्या ठेक्यावरील सुपरवायझरवर हल्ला करीत लूटले
Supervisor on ash contract attacked and robbed in Susari Shivar भुसावळ (31 जानेवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारातील राखेच्या ठेक्यावरील सुपरवायझरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत दोघांनी खिशातील चार हजार 200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना शुक्रवार, 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


काय घडले नेमके ?
सुसरी शिवारात आसरामाता मंदिराजवळ राखेचा ठेका आहे. तिथे आसीफ शब्बीर तडवी (24, रा.मिल्लत नगर, भुसावळ) हे सुपरवायझर आहेत. शुक्रवार, 24 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता ते ड्युटीवर असताना संशयीत करण बेलदार आणि नितीन बेलदार (दोन्ही रा.वेल्हाळा, ता.भुसावळ) यांनी येऊन सुरुवातीला शिविगाळ केली. त्यानंतर करण बेलदारने लोखंडी रॉडने तडवी यांच्या मानेवर मारहाण केली तसेच त्यांच्या जवळील मोबाईल फेकून फोडून नुकसान करीत खिशातून चार हजार 200 रुपये जबरदस्तीने काढले. जखमी झालेल्या आसीफ तडवी यांना वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी करण बेलदार आणि नितीन बेलदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव करीत आहेत.





