भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गुणवंतांना वार्षिक पारितोषिक वितरण


भुसावळ (2 फेब्रुवारी 2025) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, एनसीसी 18 महाराष्ट्र बटालियनचे लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, सुबेदार मेजर सुरेश कुमार यांची उपस्थिती होती. बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, राजीव पारीख, प्रवीण भराडीया, गोपाल ठाकूर, प्राचार्य डी.एम.पाटील उपस्थित होते.

गुणवंतांचा पारितोषिकाने गौरव
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन करीत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन सह मशाल ज्योत पेटवून तसेच 21 तोफांची सलामी देऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांची शिस्त व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. यात हॉर्स रायडिंग, मोटर बाईक पिरॅमिड, आदिवासी लोकनृत्य, बांबू डान्स, सेक्शन अटॅक, मार्शल आर्ट्स, देशभक्तीपर नृत्य, भारतीम, योगा, पुष्पा फिल्मी नृत्य, सामूहिक नृत्य इत्यादींचे मनोरंजक तसेच साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व पटवणारी हृदयस्पर्शी नाटिका तसेच 26/11 च्या मुंबई शहरावरील अतिरेकी हल्ल्याचे चित्त थरारक सादरीकरण हे या कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते.


या कार्यक्रमात शाळेच्या 1100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन अलिना खान व प्रगती टेंभुर्णीकर यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !