अंजाळे गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले
यावल (3 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ मोर नदीतून अवैध वाळू चोरी करून नेत असतांना डंपर पकडण्यात आले. यावल पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा लाख 16 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
अंजाळे गावाजवळ असलेल्या मोर नदीच्या पात्रातून डंपर (क्रमांक एम.एच.40-7195) यामध्ये संदीप देविदास भोई हा वाळू चोरी करून नेत होता. याची माहिती यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळतात त्यांनी पथकाला त्या ठिकाणी पाठवले व यावल रोडवर सदर डंपर पथकातील सहायक फौजदार असलम खान, हवालदार मुकेश पाटीलसह आदींनी पकडले. वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने यावल पोलीस ठाण्यात हवालदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून संदीप भोई व तानाजी वाघ यांच्याविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सहा लाख 16 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.








