दुहेरी हत्याकांडाने साईनगरी हादरली : पहाटेच्या घटनेने खळबळ


Sainagari shaken by double murder: Early morning incident creates excitement शिर्डी (3 फेब्रुवारी 2025) : देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईनगरीत दोन कर्मचार्‍यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली असून एक जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या असून आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

साई संस्थान कर्मचार्‍यांचा मृत्यू
सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजुळ अशी मृत कर्मचार्‍यांची नावे आहेत तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहत. मृत कर्मचारी व जखमी तरुण सोमवारी पहाटे साई संस्थानच्या आपल्या नोकरीवर येत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात सुभाष व नितीन हे दोघेही जागीच ठार झाले. या दोघांवर तासाभराच्या अंतराने हल्ला करण्यात आला.



लुटीच्या उद्देशाने हल्ला ?
हा हल्ला कशामुळे झाला? याचे ठोस कारण स्पष्ट नसले तरी लूट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी तासभर विलंबाने घटनास्थळ गाठल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा
आरोपींवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका
पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला. घोडे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोवर अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.

दोषींवर होणार निलंबनाची कारवाई
घटनास्थळी माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील येत घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगितले. ज्या पोलिसाला अपघात व खून यातील फरक कळत नाही त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे, पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची भेट घेतली. याशिवाय शिर्डीचे ताराचंद कोते, सचिन चौघुले, कैलास कोते, शिवाजी गोंदकर, अनिता जगताप, विजय जगताप, कैलास कोते आदींनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेतली. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !