जावयासोबत मुंबई फिरण्यासाठी आलेल्या 55 वर्षीय महिलेसोबत घडले विपरीत…हमालाला पडल्या बेड्या
मुंबई (3 फेब्रुवारी 2025) : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाही. अशातच एका हमालाने 55 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात महिलेला नेत आरोपीने अत्याचार केला व हा प्रकार समारे येताच आरोपीला पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या.
काय घडले नेमके
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित महिला ही आपल्या जावयासह मुंबई पाहण्यासाठी आली होती मात्र मुंबईत रात्री उशीरा पोहोचल्यामुळे तिला विश्रांतीची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे पीडितेने आणि जावयाने रात्रीचा मुक्काम वांद्रे स्थानकावरच करण्याचा निर्णय घेतला. टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6-7 वर पीडित महिला झोपलेली असताना आरोपीने पीडित महिलेला जवळच उभ्या असलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वेत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.


पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची तक्रार रेल्वे पोलिसांत केली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. त्यानंतर रविवारी सकाळी आरपीएफ आणि जीआरपीने आरोपीला अटक केली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






