धुळे जिल्ह्यात कोम्बिंगमध्ये गुन्हेगारांचे दणाणले धाबे : चार तलवारींसह पिस्टल व लाखोंचा गांजा जप्त
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी : 111 वाहन चालकांविरोधात दंड
Criminals raided in Dhule district’s Combing: Four swords, pistols and ganja worth lakhs seized धुळे (3 फेब्रुवारी 2025) : ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत धुळे जिल्ह्यात पोलीस दलाने कोम्बिंग ऑपरेशन राबवत एक पिस्टल, जिवंत काडतूसासह चार तलवारी जप्त केल्या शिवाय 111 वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करीत एक लाख 20 हजारांची गावठी दारू जप्त केली शिवाय पावणे दोन लाखांचा गांजा देखील जप्त करणयात आली. या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असून कारवाईत सातत्य असेल, असे धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.
मध्यरात्री कोम्बिंग
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 23 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. 17 पोलीस ठाण्याचे 27 अधिकारी व 98 पोलीस अंमलदारांसह एलसीबीच्या टीमने एकाचवेळी कारवाई केली. सोमवार, 3 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाभरात नाकाबंदी करून ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबविण्यात आली. एलसीबीच्या पथकाने मोहाडी नगर आणि चाळीसगाव रोड हद्दीत इरफान शहा असगर शहा (रा. काझी शेत, नटराज टॉकीज मागे, धुळे आणि कुर्बान पठाण महमूद पठाण (रा.पवन नगर, पश्चिम हुडको) या दोघांकडून चार तलवारी जप्त केल्या तर शिरपूर तालुका पोलिसांनी चिलारे (ता. शिरपूर) येथील नवीन तारक्या पावरा याच्याकडून एक लाख 81 हजार किंमतीचा आठ किलो गांजा जप्त केला.
38 हातभट्टींवर कारवाई
जिल्ह्याभरात 38 हातभट्टींवर कारवाई करण्यात येऊन एक लाख 19 हजार 730 रुपयांची गावठी हातभट्टी दारू तसेच दारू बनविण्याचे साहित्य जप्त झाले. धुळे एलसीबीच्या पथकाने सडगाव (ता.धुळे) येथील विजय वसंत शिंदे आणि धुळ्यातील साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनीतील महेश अंबर मोरे या हव्या असलेल्या आरोपींना पकडले. एलसीबीने मोहाडी नगर हद्दीत तेजस उर्फ तुषार रणजीत सिसवाल (रा.रामदेव बाबा नगर, नटराज टॉकीज समोर, धुळे) याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक राऊंड जप्त केले.
मोकळ्या जागी नदीकिनारी दारू पिणार्या 16 जणांना पोलिसांनी पकडले. जुगार कायद्यान्वये 11ा केसेस करून 8 हजार 445 रुपये जप्त करण्यात आले. या मोहिमेतंर्गत हिस्ट्रीशिटर आणि रेकॉर्डवरील 38 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली तसेच 85 बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊसची झाडाझडती घेण्यात आली.
वाहतूक शाखाही अॅक्टीव्ह मोडवर
शहर वाहतूक शाखेने ऑल आऊट मोहिमेंतर्गत प्रभावी कारवाई केली. मोटर व्हेईकलच्या 111 केसेस करून 37 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. ऑल आउट ऑपरेशन प्रभावी होण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शाखा अधिकारी यांना सूचना दिल्या. या मोहिमेतंर्गत तडीपार इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले.
असामाजिक तत्वांवर नेहमीच कारवाई : पोलीस अधीक्षक
शहरासह जिल्ह्यात आगामी काळातही नाकाबंदी, कोंबिंग आणि ऑल आऊट मोहिम राबविण्यात येईल. गुंडगिरी करणार्या टवाळखोर, असामाजिक तत्त्वावर प्रभावी कायदेशीर कारवाया करण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.