धावत्या रेल्वेखाली आल्याने जळगावातील व्यावसायीकाचा मृत्यू
Businessman from Jalgaon dies after being hit by a moving train जळगाव (6 फेब्रुवारी 2025) : धावत्या रेल्वेखाली आल्याने व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सोमवार, 3 रोजी सायंकाळी सात वाजता शिरसोली शिवारात डाऊन रेल्वे लाईनवर ही घटना घडली. गणेश बंडू बडगुजर (वय 61, रा. खेडी कढोली, ह. मु. नवनाथ नगर, वाघ नगर) असे मृताचे नाव आहे. नैराश्यातून त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आत्महत्या केल्याची माहिती
गणेश बडगुजर हे गहू, बाजरीसह कडधान्याचा कढोली येथे व्यवसाय करीत होते. यासाठी त्यांनी दुकान थाटले होते. व्यवसायवाढीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाची फेड करण्याच्या चिंतेतून ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात व तणावात होते.


सोमवारी संध्याकाळी ते कोणाला काहीएक न सांगता घराबाहेर पडले. शिरसोली शिवारात रेल्वे खंबा क्रमांक 413/23 नजीक डाउन रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेखाली त्यांनी टोकाचा निर्णय घेत मृत्यूला कवटाळले. ही खबर लोको पायलट हरिप्रकाश यांनी स्टेशन प्रबंधक यांना दिली. माहिती प्राप्त होताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास गुलाब माळी हे करीत आहेत.
शेतकर्यांना द्यायचे मदतीचा हात
गणेश बडगुजर हे शेतकर्यांना नेहमी सहकार्य करायचे. त्यांच्या गरजेपूर्तीसाठी नेहमी पुढाकार घेऊन मदत करीत असायचे. शेतकर्यांचे काम तत्काळ मार्गी लावण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे ते कढोली पंचक्रोशीत सर्वत्र परिचित होते. त्यांच्या अपघाती निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली.






