किनगावात पोस्टाची 16.50 लाखात फसवणूक : मयत कर्मचार्याविरोधात गुन्हा
यावल (6 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथील पोस्ट ऑफीस मधील एका तत्कालीन कर्मचार्यांने नागरिकांकडून बचत ठेव म्हणून रक्कम स्वीकारली मात्र, तिची पोचपावती न देता परस्पर हस्ताक्षर करून पासबुकवर नोंदी करून दिल्या आणि ग्राहकांची फसवणूक केली. या कर्मचार्याने 32 ग्राहकांकडून तब्बल 16 लाख 50 हजार 500 रूपये जमा करीत ते पोस्टात जमा केले नाही. याप्रकरणी कर्मचार्याविरूध्द यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निखील रवींद्र पारिस्कर (साकळी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
किनगाव येथे पोस्ट ऑफिस कार्यालय आहे. या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये निखीलल रवींद्र पारिस्कर (साकळी) हा कर्मचारी सन 2019 मध्ये कार्यरत होता व त्याने 26 फेब्रुवारी 2019 ते 13 जुलै 2022 दरम्यान 32 ग्राहकांकडून पोस्ट ऑफिसच्या पासबुकवर बचत खात्यात जमा करण्यासाठी 16 लाख 50 हजार 500 रुपयाची रक्कम स्वीकारली मात्र ग्राहकांना कुठल्याच प्रकारची पोचपावती न देता स्वतः पासबुकवर हस्ताक्षर करून रक्कम स्वीकारून ती परस्पर खर्च केली. 2024 मध्ये या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार पोस्ट विभागाच्या निर्दशनास आल्यानंतर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात यावल उपविभाग कार्यालयाचे डाक निरीक्षक डिगंबर दत्तात्रय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत निखील पारिस्कर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.