कायदेविषयक परीक्षेत भुसावळ पोलीस दलातील कर्मचारी ‘अव्वल’
पोलीस अधीक्षकांची संकल्पना ः रुपाली कोलते प्रथम तर भूषण चौधरी द्वितीयस्थानी
भुसावळ (7 फेब्रुवारी 2025) : शिस्तीचे खाते म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलातील कर्मचार्यांना प्रचलित व नवीन कायद्यांचे असलेले ज्ञान जाणून घेण्यासाठी भुसावळ शहरातील शासकीय आयटीआयमध्ये नुकतीच भुसावळ विभागातील 42 कर्मचार्यांची कायदेविषयक शंभर गुणांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सर्वच कर्मचारी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक शहर ठाण्याच्या हवालदार रुपाली मुरलिधर कोलते (82), द्वितीय क्रमांक भूषण लिलाधर चौधरी (77) तर तृतीय क्रमांक ग्रेडेड उपनिरीक्षक इक्बाल इब्राहीम सैय्यद (75) यांनी पटकावला. परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणार्या कर्मचार्यांचा लवकरच पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बक्षिसाने सन्मान केला जाणार आहे.
उपक्रमशील पोलीस उपअधीक्षकांनी घेतली परीक्षा
भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळख आहे. पिंगळे यांनी पदभारानंतर कर्मचार्यांचा कामाप्रती उत्साह वाढवण्यासाठी ‘एम्प्लाई ऑफ द मंथ’ ही संकल्पना रूजवली तर विभागातील सर्वच पोलीस ठाण्यातील दप्तर अद्यावत करीत सर्वच पोलीस ठाण्यांचे रूपडे बदलवले. त्यांच्या कार्याची दखल नाशिक आयजी दत्तात्रय कराळे यांनी घेतली. नाशिक परिक्षेत्रात अशा उपक्रमांची अंमलबजावणीचे निर्देश त्यांनी अलीकडेच अधिकार्यांना दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या संकल्पनेतून त्यांनी भुसावळात 4 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेतल्याने कर्मचार्यांमध्ये उत्साह दुणावला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या काळात प्रथमच अशा पद्धत्तीची पोलीस दलात भुसावळात परीक्षा झाल्याने कर्मचार्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.
शंभर गुणांची परीक्षा
शंभर गुणांच्या कायदेविषयक परीक्षेत भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, किरकोळ कायदे, महाराष्ट्र पोलीस नियमावली 1959 या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.
गुन्हे तपास गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावा : कृष्णात पिंगळे
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेनुसार पोलिसांनी गुन्हे तपास गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावा. पोलिसांचे कायदेविषयक ज्ञान वृध्दींगत व्हावे या उद्देशाने परीक्षा घेण्यात आली. ज्या पोलिसांनी कायद्याचा अभ्यास प्रामाणिकपणे केला आहे अशांचा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत बक्षीस देऊन सन्मान करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आल्याचे भुसावळातील उपक्रमशील पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले.