वडोदानजीक टायर फुटल्याने चारचाकी दुचाकीवर आदळल्याने साकळीतील तरुण ठार

A youth from Sakli was killed when a four-wheeler hit a two-wheeler due to a burst tire near Vadodara. यावल (8 फेब्रुवारी 2025) : अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर यावल शहराबाहेर वडोदाजवळ चारचाकी वाहनाचे टायर फुटल्यानतंर ती दुचाकीवर जावून आदळल्याने साकळीतील 24 तरुण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. मयत तरुण त्याच्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी साकळी येथून डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे साकळी गावातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
साकळी गावात शोककळा
अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील यावल-चोपडा रस्त्यावरील वडोदा गावाजवळील पूलाजवळून शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.क्यु. 1709) घेऊन करण विजय जंजाळे (24, रा.आंबेडकर नगर, साकळी) हा तरुण यावलकडे येत होता तर यावलकडून चोपड्याकडे वॅगन आर कार (क्रमांक एम.एच. 19 ए. पी. 3273) घेऊन चालक जात असताना कारचा टायर फुटला आणि काही क्षणातच समोरून येत असलेल्या दुचाकीवर जाऊन कार धडकली. या अपघातात तरुण दुचाकीसह शेजारील नाल्यात पुलाखाली कोसळला. कारच्या धडकेत दुचाकीचे हॅन्डल तरुणाच्या डाव्या बाजुस छातीत खुपसले जावुन जबर दुखापत होत तो जागीच ठार झाला.
अपघातानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. व यावल पोलिसांना माहिती दिली. यावल पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अपघातानंतर कार चालक कार सोडून पसार झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मिलिंद जंजाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.


