धुळे तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : आलिशान कार भाड्याने घेत परस्पर विक्री करणार्या हैद्राबादच्या टोळीला बेड्या
दोन महागड्या कार जप्त : फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता

Dhule Taluka Police’s big achievement : Hyderabad gang arrested for renting and selling luxury cars धुळे (8 फेब्रुवारी 2028) : धुळे तालुका पोलिसांनी भाडे तत्वावर कार घेवून परस्पर विक्री करणार्यांच्या हैद्राबादस्थित टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून दोन महागड्या कार जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी नांदगावच्या एकाची तालुका हद्दीत फसवणूक केल्यानंतर पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली.
तीन लाख रुपये लाटत कार पुन्हा लांबवली
नांदगाव, जि.नाशिक येथील अभिषेक शिवाजी पाटील यांना सोशल मिडीयावर महिंद्रा कंपनीची थार ही कार (क्रमांक टीएस 07 केबी 7004) ची विक्री होत असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला असता अरबाज नसीम शेख, मो.अझरुददीन अब्दुल रज्जाक, सैय्यद अबरार, अकबर अहमद यांनी शिरूड चौफुलीवर येत वाहन दाखवून सहा लाखात सौदा निश्चित केला व तीन लाख रुपये आगावू घेतले व उर्वरीत तीन लाख वाहन नावावर करताना देण्याचे ठरले मात्र पाटील यांनी वाहन नावावर करण्यासाठी आरोपींशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर 10 दिवसांनी काही इसमांनी फिर्यादी पाटील यांच्याशी संपर्क साधला. मो.मझर अहमद इप्तेकार अहमद सिध्दीकी, मोहम्मद अब्दुल्लाबीन सैफ, सैय्यद शहा फवाद शहा (सर्व राचंद्रयान गुटटा, हाफी बाबा नगर, हैद्राबाद) यांनी आपणच ठार कारचे मालक असल्याचे सांगून वाहनाला जीपीएस लावल्याने त्यांच्यापर्यंत कार शोधत आल्याचे सांगत पुन्हा वाहन नेले.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल
पाटील यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पाटील यांनी पुन्हा नाव बदलून आरोपींशी संपर्क साधून कार खरेदी करायची असल्याचे सांगितल्यानंतर मारुती सुझुकी कार (क्रमांक एक्सएल 6 टिजी 07- सी 1989) हिचे फोटो व्हॉटसअॅपवर दाखविल्याने खरेदीची तयारी दर्शवल्यानंतर आरोपी कार घेवून शिरुड चौफुली येथे आले. यावेळी पाटील यांनी फसवणूक करणार्या तीन आरोपींना ओळखल्याने त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांच्या मदतीने सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले व धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात नेमलेल्या गस्ती पथकाने आरोपींना पळून जाण्यापूर्वीच अटक केली व त्यांच्याकडून दोन कारदेखील जप्त केल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल छाया पाटील, हवालदार कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, ललित खळगे, योगेश पाटील, अविनाश गहिवड, चेतन कंखरे, योगेश कोळी, धीरज सांगळे, सखाराम खांडेकर, राजू पावरा, भावेश झिरे आदींच्या पथकाने केली.


