अट्रावलच्या मुंजोबा यात्रेतून 11 महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत लांबवल्या
Gold chains were removed from the necks of 11 women during Atraval’s Munjoba Yatra यावल (11 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 11 महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत लांबवल्या. गर्दीतून नागरिकांनी काही संशयीतांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र त्यांच्याकडून पोलिसांना काहीच मिळून आले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. यात्रेत गर्दीचा फायदा घेत काही महिलाच चोरटे फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गर्दीचा फायदा घेत लांबवल्या पोत
अट्रावल, ता.यावल येथील प्रसिद्ध मुंजोबा यात्रोत्सवात सपना भरत कोळी (गोरगावले, ता.चोपडा) यांच्यासह विविध महिला आल्या होत्या. कोळी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली. साडेसात हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरी झाली. याच यात्रेत रत्ना रवींद्र कुंभार (नायगाव, ता.यावल), दीपाली सतीश पाटील (रा.थोरगव्हाण, ता.यावल), पूनम नंदू धनगर (धरणगाव), छाया रवींद्र हिरे (महाबळ कॉलनी जळगाव), मनीषा संजय हिरे (भुसावळ), दीपाली ज्ञानेश्वर बाविस्कर (कुसुंबा, ता.जळगाव), अन्नपूर्णा वसंत सुरवाडे (रा.भुसावळ), भावना प्रवीण तायडे (निमगाव, ता.यावल) व ज्योती हेमंत महाजन (रा.पारोळा) अशा या 11 महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या पोत चोरी झाल्या.








