भुसावळात बारावी परीक्षेला शांततेत सुरूवात : परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर
सात केंद्रावर 3649 विद्यार्थी प्रविष्ट : संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेर्याची नजर : बैठे व फिरते पथकाकडून होणार कारवाई
भुसावळ (11 फे्रबुवारी 2025) : बारावी परीक्षेला मंगळवार, 11 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने परिपूर्ण तयारी केली आहे. यंदा परीक्षेवर सीसीटीव्हीसह बैठे व फिरत्या पथकाची काटेकोर नजर असणार आहे. भुसावळातील सहा व वरणगावातील एक मिळून एकूण सात केंद्रावर तीन 649 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीची मदत
मंगळवारी सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरूवात होणार असलीतरी प्रत्यक्षात साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल शिवाय यंदाही वॉटर बॉय नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बाटली घरून न्यावी लागेल. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके कार्यरत राहणार असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडणार आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी परीक्षा खोल्यांमध्ये पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी पॅड, हॉल तिकिट, पुरेसे लेखन साहित्य आणावे व उन्हापासून बचावासाठी डोक्याला रुमाल बांधावा, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेर्यांनी नजर असेल.

शिक्षण विभागाची बैठक
शिक्षण विभागाने केद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना परीक्षेच्या दृष्टीने सूचना केल्यात. यावेळी कस्टडीयन तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी. धाडी उपस्थित होते. सोमवारी शहरातील सहा केंद्रावर बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले व वर्गखोल्यांच्या दरवाजांवर बैठक क्रमांकाची माहिती तसेच वर्गातील बाकांवर क्रमांक टाकण्यात आले. परिक्षा केंद्राच्या प्रवेशव्दारावरही बैठक व्यवस्थेची माहिती देण्यात आली. के.नारखेडे, नाहाटा, डीएल हिंदी विद्यालय, संत गाडगे महाराज हायस्कूल, बीझेड उर्दू हायस्कूल, बियाणी ज्युनियर कॉलेज या शहरातील केंद्रावर तसेच ग्रामीण भागासाठी वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात परीक्षा होईल.
केंद्रनिहाय विद्यार्थी संख्या अशी
के.नारखेडे विद्यालय (264), नाहाटा महाविद्यालय (759), डी.एल.हिंदी हायस्कूल (469), संत गाडगे महाराज विद्यालय (353), बी.झेड उर्दू हायस्कूल (391), बियाणी ज्युनियर कॉलेज (482), महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव (931).






