पुण्यात 1200 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघड


GST scam worth Rs 1200 crore exposed in Pune पुणे (12 फेब्रुवारी 2025) : बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) व्यवहारांमध्ये सहभागी बोगस कंपन्यांचे एक अत्याधुनिक नेटवर्क आता समोर आले असून या माध्यमातून पुण्यात 1200 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा घडल्याचे समोर आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय)च्या पुणे विभागीय शाखेने कारवाई करीत एका व्यक्तीला अटक केली आहे. पुणे, दिल्ली, नोएडा आणि मुझफ्फरनगरमधील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली.

अटक केलेली व्यक्ती मुझफ्फरनगरमधील एका खाजगी कंपनीची संचालक असून या ऑपरेशनमागील सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात आढळून आले आहे की, त्यांच्या ग्रुपने पत्ते, ओळखपत्रे, ईमेल आयडी आणि फोन नंबरचा डेटाबेस ठेवला होता आणि नवीन जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी आणि शोध टाळण्यासाठी शिताफीने तो वापरला जात होता. नव्याने स्थापन कंपन्यांवर याच ग्रुपमधून संचालक किंवा मालक निवडले गेले होते, ज्यामुळे फसवणूक करणार्‍यांना बेकायदेशीर व्यवहार चालू ठेवता आले.




व्यापाराचे अस्सल चित्र उभे करण्यासाठी आरोपींनी कोणतेही कायदेशीर व्यवसाय नसलेल्या बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. बनावट इनव्हॉइस आणि ई-वे बिल तयार केले होते. आणि या ई-वे बिलांवर आरएफआयडीचा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे मालाचा प्रत्यक्ष पुरवठा झाला नसल्याचे सिद्ध झाले. या बनावट टोळीने 1,196 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी मिळवले आणि दुसर्‍यांना देखील दिले.

अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अधिकार्‍यांना मूळ पावत्या, आर्थिक नोंदी, कंपनीचे स्टॅम्प्स आणि सील सापडले. तपासात आतापर्यंत अशा 20 बनावट कंपन्या आढळल्या आहेत. ज्यांचा कोणताही खरा व्यवसाय नाही. अधिकार्‍यांनी बनावट कंपन्यांशी संलग्न एक बँक खाते देखील गोठवले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !