भुसावळात लेखापालाला मारहाण : संशयीत रजत बढेची जामिनावर सुटका
भुसावळ (13 फेब्रुवारी 2025) : गेलेला निधी परत आणण्यासाठी पत्राची मागणी करीत भुसावळ पालिकेतील लेखापालास मारहाण करण्यात आल्याची घटना गत आठवड्यात गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी पालिकेत घडली होती. याप्रकरणी भुसावळातील रजत बढे या तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठवडाभरानंतर संशयीत शहर पोलिसात गुरुवारी स्वतःहून हजर झाल्यानंतर त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली व नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
काय आहे प्रकरण
भुसावळ पालिकेत लेखापाल हर्षल वाणी हे काम करीत असताना गुरुवार, 6 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भुसावळातील कंत्राटदार विनय बढे यांचे पुतणे रजत संजय बढे हे पालिकेत आले व त्यांनी लेखापाल वाणी यांना परत गेलेला निधी मी परत आणतो व त्यासाठी पत्र द्यावे, अशी मागणी केली मात्र त्यावरुन वाणी व बढे यांच्यात शाब्दीक वाद झाला व याचवेळी रजत बढे यांनी शिविगाळ करीत टेबलावरील संगणक संच पाडून फाईल डोक्यावर मारली तसेच कानशीलात चापट मारल्याने वाद वाढला. यावेळी संशयीताने हर्षल वाणी यांना तू एकटा कसा बाहेर जातो म्हणत तुझे हातपात तोडून तुला गाडीसह जाळून टाकतो, अशी धमकी दिल्याचे वाणी यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रारीत म्हटले होते. या प्रकारानंतर कर्मचार्यांनी काम बंद करीत दोषीवर कारवाईची मागणी केली होती तसेच वरिष्ठ स्तरावर निवेदनही देण्यात आले होते.



न्यायालयाने केली जामिनावर सुटका
गुरुवार, 13 रोजी रजत बढे हा स्वतःहून शहर पोलिसात हजर झाल्यानंतर त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयीतार्फे अॅड.मनीष सेवलानी यांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने 20 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तपास पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद करीत आहेत.





