श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त थोरगव्हाणला देवकाठी मिरवणूक
सावदा (13 फेब्रुवारी 2025) : थोरगव्हाण, ता.रावेर गावातील श्री भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी थोर सन्मित्र युवा फाउंडेशनतर्फे मोठ्या उत्साहात वधू-वरवर परिचय मेळावा तसेच समाजात उल्लेखनीय काम करणार्या नागरिकांचा भव्य नागरी सत्कार डी.एस.देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी नाशिकचे उद्योजक सुनील चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार एकनाथराव खडसे, छत्रपती संभाजीनगर भरारी पथक दारूबंदी निरीक्षक अनिल पाटील, डॉ.दीपक बाऊस्कर, डॉ.शरतन चौधरी, दीपनगरचे जु.कमिशन ऑफिसर शरद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार तसेच समाजातील विशेष प्राविण्य मिळवणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात वधू-वरांनी आपला परिचय करून दिला.

आमदार खडसेंनी दिली भरीव देणगी
मनोगतात आमदार खडसे यांनी यात्रेनिमित्त येणार्या भाविकांच्या निवासासाठी एक विश्रामगृह स्व.माजी आमदार आर.आर.पाटील यांच्या नावाने असावे, असे सांगत त्यासाठी भरीव देणगी जाहीर केली. सुनील चौधरी यांनी बाहेर गावावरून येणार्या नागरिकांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन एम.आर.चौधरी तर आभार युवराज कुरकुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी थोर संमित्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव सचिन झोपे, सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
देवकाठी मिरवणूक उत्साहात
सायंकाळी देवकाठी उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली. यावेळी परिसरातील गावा-गावातून जवळपास 10 ते 15 देवकाठ्या आल्या होत्या. देव काठ्यांची विधीवत पूजा करून त्यांची वाजत-गाजत गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे तरुण युवकांनी 40 ते 50 फूट उंच आणि वजनाने 25 किलो असलेली देवकाठी तळहातावर, दातांवर, डोक्यावर तोलून आपले कर्तब दाखविले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पोलीस कर्मचारी असेच महावितरण कर्मचारी यांनी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपापली जबाबदारी चोख सांभाळली. यात्रेच्या दुसर्या दिवशी सकाळी 10 वाजता थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतीमधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात भैरवनाथाच्या मुकुटाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांची अलोट गर्दी उसळली. श्री भैरवनाथांचा मुकुट वाजत गाजत दुपारी 12 वाजता मंदिरातील बाण्यावर चढवण्यात आले. एक वाजेपर्यंत भगवंताचा शृंगार करण्यात आला. मानाची पहिली पूजा गावचे पोलीस पाटील अरविंद झोपे यांच्याहस्ते करण्यात आली. नंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. प्रसंगी सावदा पोलीस स्टेशनचे तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.






