वर्क फ्रॉम होम नोकरीच्या आमिषाने सांगवी गावातील तरुणाला लाखाचा गंडा
यावल (14 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावातील 32 वर्षीय तरुणाला व्हॉटसअॅपवर मेसेज टाकून वर्क फ्रॉम होम नोकरी देण्याचे आमिष दाखवून अज्ञात तिघांनी 97 हजारांचा गंडा घातला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात तीन अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी झाली तरुणाची फसवणूक
सांगवी बुद्रुक गावातील रहिवासी वासुदेव रामदास भंगाळे (32) या तरुणाला एका व्हाट्सअॅप क्रमांकावरून मेसेज आला आणि त्याला वर्क फ्रॉम होम या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. त्याला प्रारंभी 600 रुपये पाठवून त्याचा विश्वास संपादन करण्यात आला. नंतर त्याच्याकडून तीन अज्ञातांनी युपी आयडीच्या माध्यमातून त्याच्या खात्यातून 97 हजार पाचशे रुपये लांबवले आणि त्याची फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात वासुदेव भंगाळे यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे.








