भुसावळात गारमेंट कंपनीला भीषण आग : 35 लाखांचे नुकसान


भुसावळ (14 फेब्रुवारी 2025) : शहरातील श्रीराम नगरातील रंजना संजय परदेशी यांच्या गिफ्ट फॅशन डिझाईन गारमेंट येथे गुरूवारी दुपारी 12.55 वाजेच्या सुमारास शिलाई मशीनजवळ शॉक सर्कीट होऊन आग लागली. या आगीत 18 शिलाई मशीन, टिव्ही, फ्रिज, सोफासेट, लॅपटॉप, संगणक, फॅन, कुलर, गारमेंटचा पाच लाखांचा कच्चा माल जळाला. आग विझविण्यासाठी दोन बंबांच्या तीन फेर्‍या झाल्यात.

शॉर्ट सर्किटने लागली आग
शहरातील श्रीराम नगरातील रंजना संजय परदेशी यांचे गिफ्ट फॅशन डीझाईन गारमेंट या नावाने आहे. गुरुवार, 13 रोजी दुपारी संजय परदेशी हे त्यांच्या मुलाचा सीईटीचा फॉर्म भरण्यास घरून निघाले तर त्यांचा मुलगा ललित हा बारावीला असल्याने त्याचा मराठीचा पेपर असल्याने तो सुध्दा परीक्षेला निघून गेला. तर रंजना परदेशी या त्यांच्या लॉण्ड्रीच्या दुकानात गेल्या. यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावले होते. घरी कोणीच नसतांना दुपारी 12.55 वाजेच्या सुमारास घरात शॉर्टसर्कीटने आग लागली. घरात कपडे शिवण्यासाठी असलेल्या शिलाई मशीनच्या प्लगजवळ शॉट सर्कीट होऊन आग लागली अशी माहिती घर मालक संजय परदेशी यांनी दिली.

दोन तासांनी विझली आग
माजी नगरसेवक निर्मल कोठारी तसेच पालिकेच्या बंबावरील राजेश कोळी, सुमीत सावळे, राजू ठोके, विजय मनोरे, धनसिंग सपकाळे, फायरमन गौरव सपकाळे, यश मनोरे, रवींद्र पाटील, राहुल तायडे, दिलीप पाटील यांनी तब्बल दोन तासाच्या प्रयत्नांनी आग विझवली. सुदैवाने घरातील सिलिंडरला आगीची झळ बसली नाही अन्यथा मोठा अनर्थ होण्याची भीती होती.

35 लाखांचे नुकसान
संजय परदेशी यांनी सांगितले की, आग लागली त्यात आमच्या गारमेंटच्या 18 शिलाई मशीन, लॅपटॉप, संगणक, दोन सोफासेट, टिव्ही, कुलर, पंखे, घरातील फर्निचर, सीसीटिव्ही कॅमेरे, घरातील धान्य, मुलांचे शाळेची पुस्तके आणि पाच लाख रुपये किंमतीचे गारमेंट शिवण्याचे कच्चे साहित्य मिळून 35 लाखांचे नुकसान झाले. मंडळाधिकारी प्रफुल कांबळे, शहर तलाठी पवन नवगाळे यांनी आगग्रस्त घराला भेट देत पाहणी केली.


कॉपी करू नका.