चारठाणा नियतक्षेत्रात डिंक तस्करांचा वनकर्मचार्यांवर दगडांनी हल्ला : रस्त्यात पेरले गावठी बॉम्ब ; एका आरोपीला अटक
मुक्ताईनगर (14 फेब्रुवारी 2025) : वढोदा वनपरिक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात (551) डिंक तस्करांनी वन कर्मचार्यांवर दगड व गोटे मारून हल्ला केला तर पथक आरोपींच्या मागावर असताना आरोपींनी जंगलाला आग लावली तसेच रस्त्यावर गावठी बॉम्ब पेरले. या घटनेत एक बॉम्ब वाहनाच्या खाली येवून फुटला मात्र सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. दरम्यान, या प्रकारानंतर वनविभागाने एका संशयीताला चारठाणा येथून अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जंगलात आढळले गावठी बॉम्ब
वढोदा वनपरिक्षेत्रात पथक गस्तीवर असताना त्यांना काही डिंक तस्कर आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरएफओ परिमल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयीतांचा पाठलाग सुरू केला असता आरोपींनी दगड-गोटे भिरकावण्यास सुरवात केली व पलायन करताना जंगलाला आग तावली. पथकाने पाठलाग करू नये माणून वाहनाच्या मार्गावर गावठी बॉम्ब पेरण्यात आला व बॉम्ब पथकाच्या वाहनाच्या चाकाखाली येऊन फुटला, त्यात सुदैवाने आरएफओसह वाहनातील सहा कर्मचारी बचावले. बुधवार, 12 रोजी रात्री 11 बाजेच्या सुमारास हा थरार रंगला.



एका संशयीताला अटक
डिंक तस्करांची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी चारठाण्यापासून
कमान बावडी रस्त्याने पथक गस्त घालत असताना मध्यप्रदेश सीमा अर्धा किलोमीटर अंतरावर असताना बुधवारी सायंकाळी 25 ते 30 संशयीतांनी दगड व गोट्यांचा गोफणीतून मारा सुरू केला. यावेळी आरएफओ परिमल साळुंखे यांना माहिती कळवल्यानंतर ते अधिक कुमक घेवून आल्यानंतर आरोपींनी जंगलाला आग लावली तसेच रस्त्यात गावठी बॉम्ब पेरले तर एक बॉम्ब पथकाच्या वाहनाखाली आल्यानंतर फुटल्याने वाहनाचे टायर फुटले मात्र सुदैवाने कुणालाही ईजा झाली नाही.
या वाहनात आरएफओ परिमल साळुंखे, वनपाल बी.आर.मराठे, वनरक्षक अक्षय मोरे, सुधाकर कोळी, उमेश तायडे व मजुरांचा समावेश होता. दरम्यान, पथकाने या प्रकारानंतर अर्धा किलोमीटर रस्त्याची पाहणी करीत पाच गावठी बॉम्ब शोधून काढत ते ताब्यात घेतले.





