बोदवडला चार ठिकाणी घरफोड्या : वृद्धेला जाग येताच जामनेरातील चोरट्यांना पडल्या बेड्या
Burglary in four places in Bodwad : Thieves from Jamner were arrested as soon as the elderly woman woke up बोदवड (14 फेब्रुवारी 2025) : शहरातील विविध भागात चोरट्यांनी उपद्रव माजवत चार घरफोड्या केल्या मात्र एका ठिकाणाहून चांदीचे देव चोरताना वयोवृद्धेला जाग आली व येथेच चोरट्यांचा डाव फसला व अन् चोरट्यांना पकडण्यात नागरिकांना यश आले आहे. यावेळी चोरट्यांची चांगलीच धुलाई करीत त्यांना बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेख समीर शेख जाकीर (22, मदनीनगर, जामनेर) व मोहिउद्दीन सैय्यद मुक्की मुद्दीन (26, चाळीसगाव मोहल्ला, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चार ठिकाणी घरफोड्या
गुरुवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती भागातील संताजी नगरातील रणजित खेवलकर यांच्या बंद घरातून चोरट्यांनी कपाटातील अडीच हजार लांबवत शेजारीच असलेल्या राजेंद्र जोशी यांचे बंद घर फोडले मात्र त्यांना काहीच सापडले नाही. चोरट्यांनी फरसाणावर ताव मारत खाटीक वाड्यातील रखमाबाई कोळी यांच्या बंद घरात प्रवेश करीत देव घरातील देव व तांदुळाच्या डब्यातील एक हजार रुपये घेत साहित्याची फेकाफेक केली. चोरट्यांनी जितेंद्र गंगतिरे यांच्या घराला टार्गेट केले.



दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा
चोरट्यांनी देवघरातून 1800 रुपये किंमतीचे चांदीचे देव व पैंजण चोरले व त्याचवेळी खाटीवर जितेंद्र यांच्या आई गीताबाई झोपल्या असताना त्यांना पेटीचा आवाज आल्याने त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर चोरटे पेटी घेवून पसार झाले. यावेळी घरातील सदस्यांना जाग आली तसेच गल्लीतील सदस्यही जमल्याने त्यांनी चोरट्यांचा माग काढल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले. याप्रकरणी गीताबाई रामकृष्ण गंगतीरे (59, हनुमाननगर, बोदवड) यांच्या फिर्यादीवरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





